आमदार सुधाकर अडबाले यांचे भंडारा येथे समस्या निवारण सभेत निर्देश
भंडारा : जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकित देयके वेतन पथक कार्यालयाने पडताळणी न करता शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाठविली. क्षुल्लक त्रुटींमुळे मार्च अखेरीस शेकडो देयके परत आली. त्यामुळे ३१ मार्च पूर्वी निकाली निघणारी थकित देयके पुन्हा वर्षभर प्रलंबित राहिली. यामुळे वेतन पथक अधिक्षक (माध्य.) कार्यालयातील थकित देयके आस्थापनेची तात्काळ चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी व दोषींवर कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले.
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.), जि.प. भंडारा यांच्याकडे भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा जे. एम. पटेल कॉलेज सभागृहात पार पडली. सदर सभा सात तास चालली.
यावेळी माध्यमिक विभागातील मागील सभेतील इतिवृत्तावर चर्चा करण्यात आली. शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला होत नसल्याने आमदार सुधाकर अडबाले यांनी वेतन पथक अधिक्षक यांना जाब विचारला. वेतन बिल वेळेत मागवा आणि दरमहा १ तारखेला अदा करा, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी वेतन पथक अधिक्षक यांना दिल्या.
प्रशासकीय मान्यता झालेल्या थकबाकी देयके निकाली काढली नाही. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय देयके, सेवानिवृत्ती प्रकरणे, जीपीएफ पावत्या, ग्रॅज्युएटी प्रकरणे, समायोजन प्रकरणे, अर्जित रजा रोखीकरण, वेतनेत्तर अनुदान व इतर सामूहिक व वैयक्तिक प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. तसेच अनुकंपा प्रकरणांची सविस्तर माहिती एका आठवड्यात देण्यात यावी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या. वेतनेत्तर अनुदान येत्या १५ दिवसांत जमा करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी सांगितले.
यानंतर प्राथमिक विभागाची बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, विषय शिक्षक व इतर पदोन्नती बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती प्रकरणे ८ दिवसांत निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिल्या. जीपीएफ पावत्या ३१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ऑनलाइन करा, पेंशन दरमहा १ तारखेला खात्यात जमा करा, एनपीएस रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करा व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. प्राथमिक विभागातील समस्या बऱ्याच प्रलंबित असल्याने त्या तात्काळ निघाली काढाव्या, अशा सूचना देखील आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या.
सभेला माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, शिक्षण सभापती श्री. ईश्वरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परब, शिक्षणाधिकारी (माध्य.) रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र सोनटक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. वाहाने, वेतन पथक अधिक्षक प्रभा दुपारे, समाज कल्याण अधिकारी कोल्हे मॅडम, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, जिल्हा कोषाध्यक्ष धीरज बांते, विलास खोब्रागडे, पुरुषोत्तम लांजेवार, पंजाब राठोड, अनंत जायभाये, प्रभाकर मेश्राम, मार्तंड गायधने, म. रा. जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शाह, ढेंगे सर, सर्व गटशिक्षणाधिकारी, संबंधित अधिकारी व मोठ्या संख्येने जिल्ह्यातील विमाशि संघाचे सदस्य, समस्याग्रस्त शिक्षक उपस्थित होते.
————–
चौकशी समिती नियुक्त करा
भंडारा जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आलेली तब्बल ५.५६ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती समाज कल्याण विभागाच्या हलगर्जीपणामुळे परत गेली. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नियुक्त करावी. १ महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिल्या.