Skip to content

परिचय

चंद्रपूरजवळ असलेल्या मोठा मारडा या गावी अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. साधारणत: शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलांना जाे संघर्ष सहन करावा लागताे, ताे त्यांच्याही वाट्याला आला. मात्र, शिक्षणाप्रती असलेल्या ओढीने त्यांची स्थिती बदलली. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक आणि पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी वर्धा येथे माेठा भाऊ निळकंठ अडबाले यांच्याकडे पूर्ण केले. ५ ते ७ लाेक विद्यालय आणि ८ ते १० न्यू इंग्लिश हायस्कूल येथे झाले. ग्रामीण महाविद्यालयात १२ वी पूर्ण केली. जे.बी. महाविद्यालय, वर्धा येथे विज्ञान विषयात पदवी संपादन केल्यानंतर चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयातून बी.एड.ची पदवी प्राप्त केली. बी.एड. झाल्यानंतर लगेच २० जुलै १९८७ साली जनता विद्यालय, पिपरी येथे सहायक शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यानंतर १९८८ मध्ये जनता विद्यालय, घुग्घूस येथे रूजू झाले. या विद्यालयात सुरू झालेला शिक्षकी पेशाचा प्रवास थेट ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सेवानिवृत्ती होइपर्यंत सुरू राहिला.

शिक्षक म्‍हणून मुलांना घडविण्यासोबतच सामाजिक, सहकार क्षेत्रातही आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सबळ असावे, काेणत्याही गरजेच्यावेळी त्यांना कुणासमाेर हात पसरण्याची गरज पडणार नाही, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ‘नागपूर विभाग शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थे’ची स्‍थापना केली. सुधाकर अडबाले यांनी ठरविलेले हे ध्येय हाेते आणि त्यांनी पहिले पाऊल टाकले होते. २००४ साली १३ शाळा, १३९ सभासद आणि ४२ हजार रूपये भागभांडवलावर ही पतसंस्था त्यांनी सुरू केली. सुधाकर अडबाले यांनी लावलेल्या या इवल्याशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र आज नागपूर विभागातील ६ महसुली जिल्ह्यांपर्यंत विस्तारले. पूर्व विदर्भात या पतसंस्थेच्या १४ शाखा असून ६६६७ सभासद झाले आहेत आणि पतसंस्थेचा टर्न ओव्हर ७०० कोटी रूपयांवर पोहोचला आहे. अडचणीतील कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देणे, त्यांची गरज भागविण्याचे काम संस्थेने केले आहे. सभासदाचे कोणत्याही कारणाने निधन झाल्यास त्यांच्याकडे असलेले १०० टक्के कर्ज माफ करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था आहे.

कोरोनामध्ये निधन झालेल्या अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर सभासदांचे १०० टक्के कर्ज संस्थेने माफ केले आहे. शिवाय राज्य शासनाला मदत म्हणून पतसंस्थेकडून १ लक्ष रूपयांचा मदत निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आला. या संस्थेचे कार्य एवढ्यापुरते मर्यादित नाही. संस्‍थेद्वारे विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबविले जातात. त्यामुळेच सर्व सभासदांना या संस्थेबद्दल आपलेपणाचा विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास निर्माण करण्याचे श्रेय सुधाकर अडबाले यांच्या संकल्पना व व्यापक दृष्टीकाेणाला जाते.

अडबाले यांचा राजकीय प्रवेशही त्यांच्या लढाऊ वृत्तीतूनच झाला. शिक्षकांसाठी अनेक आंदोलन करताना ते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ या संघटनेशी जुळले. १९४६ पासून ही संघटना शिक्षकांसाठी काम करते. १९८८ साली सुधाकर अडबाले हे संघटनेचे आजीवन सभासद झाले. १९९८ साली ते चंद्रपूर जिल्हा संघटक व २००२ मध्ये त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. २५ ऑक्टाेबर २०१५ मध्ये त्यांना प्रांतीय सरकार्यवाह या पदावर जबाबदारी देण्यात आली. २१ मार्च २०२१ राेजी संघटनेने तिच्या ध्येयधाेरणानुसार लाेकशाही पद्धतीने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या २०२२-२३ च्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ही निवडणूक त्यांनी विक्रमी मतांनी जिंकली. हे त्यांनी केलेल्या कार्याचे फलित हाेय. संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडविण्यासाठी सुधाकर अडबाले यांचे प्रयत्‍न सातत्‍याने सुरूच आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन याेजना लागू होऊपर्यंत सभागृहात व सभागृहाबाहेरही त्‍यांचा लढा सुरूच राहील, असा त्‍यांचा निर्धार आहे. पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांमध्ये त्यांचा दांडगा शिक्षक संपर्क आहे आणि गेल्या ३५-४० वर्षापासूनच्या कार्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. या अनुभवाला आमदारकीची जाेड मिळाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांची विधान परिषदेच्या सभागृहातील पहिलीच एन्ट्री ही प्रभावी ठरली. सभागृहात पहिल्यांदाच गेलेले शिक्षक आमदार अडबाले यांनी शिक्षकांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. प्रश्नांची केलेली मांडणी पाहून खुद्द सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्‍यांचे कौतुक केले. आमदार अडबाले हे शिक्षकांसह सर्वसामान्‍यांच्या प्रश्नांना घेऊन किती गंभीर आहे हे, त्‍यांच्या गेल्‍या पाच अधिवेशनात सभागृह व राज्‍याने बघितले आणि पुढेही बघत राहीलच, यात तीळमात्र शंका नाही.
आमदार सुधाकर अडबाले सर निवडणुकीपूर्वी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह म्‍हणून नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात रोज दाैऱ्यावर असायचे. शिक्षकांच्या समस्‍यांना घेऊन आंदोलने, बैठका, माेर्चे हे सुरुच असायचे. आपण नेहमी बघतो की, आमदार झाल्‍यावर लोक थांबतात. पण पहिले आमदार असतील जे निवडून येण्याआधी जसे फिरत होेते. तसेच निवडून आल्‍यानंतरदेखील सतत फिरत आहेत. आज आमदार अडबाले यांना निवडून येऊन दीड वर्षांचा कालावधी होतोय. एकही दिवस ते घरी नाहीत. सतत नागपूर, अमरावती विभागातील ११ ही जिल्ह्यांत न थकता, न थांबता शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्‍याय हक्‍कासाठी प्रयत्‍नरत आहेत.