Skip to content

महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयानूसार नोकरीत सामावून घ्या

महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयानूसार नोकरीत सामावून घ्या

आमदार सुधाकर अडबाले यांचे मनपा आयुक्‍तांना निर्देश

चंद्रपूर : महानगरपालिकेतील सेवानिवृत्त झालेल्‍या व मृत्‍यू पावलेल्‍या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार सेवेत सामावून घेण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले. अनुकंपा धारक व लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांच्‍या प्रलंबित प्रकरणांबाबत आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने २ एप्रिल रोजी स्‍थायी समिती सभागृहात दुपारी बैठक पार पडली.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा आकृतीबंध १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजूर झालेला असून सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर आहे. मंजूर पदांपैकी सद्यास्‍थितीत ३१७ सफाई कामगार कार्यरत असून १४२ पदे रिक्‍त आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक १३ ऑक्टोंबर २०२४ अन्वये शासन निर्णय दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ मधिल विहित केलेल्या तरतूदी दिनांक १२/०८/१९७५ ते २३/०२/२०२३ या कालावधीतील सर्व प्रलंबित प्रकरणांना लागू असल्याने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे वारसांचे अर्ज मागविण्यात आले. यात सद्यास्थितीत अनुसूचित जातीचे ५०८ तसेच इतर प्रवर्गातील ९५ अर्ज असे एकूण ६०३ अर्ज प्राप्त झालेले आहे. त्‍यामुळे सर्व अर्जाची छाननी करून सेवाज्‍येष्ठतेनुसार यादी प्रकाशित करण्यात यावी. त्‍यावर हरकती मागवून १३ ऑक्टोंबर २०२४ च्‍या शासन निर्णयानुसार मनपा सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करावी. सदर शासन निर्णयानंतर नोकरी दिलेल्‍या वारसांची तपासणी करावी, अशा सूचना आमदार अडबाले यांनी दिल्‍या. यावर मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल यांनी ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी ९० दिवसांचा अवधी मागितला.

सदर वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार क वर्गात रिक्‍त पदी नोकरीत सामावून घेण्यात यावे. अर्ज ६०३ आणि रिक्‍त पदे १४२ असल्‍याने वाढीव पदांना पदभरतीबाबत शासनाकडे मागणी करावी, अशा सूचना देखील आमदार अडबाले यांनी आयुक्‍तांना दिल्‍या. सदर विषयावर तीन महिन्‍यांनंतर बैठक घेण्यात येईल, असेही सांगितले. महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून, त्यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी आमदार अडबाले यांची भूमिका असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.

बैठकीला मनपा आयुक्‍त विपीन पालीवाल, अति. आयुक्‍त चंदन पाटील, उपायुक्‍त मंगेश खवले, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे चंद्रपूर महानगर अध्यक्ष दिगांबर कुरेकार, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, डॉ. विजय हेलवटे, श्रीकांत पोडे, देवेंद्र बलकी, अ‍ॅड. सुजय घडसे, राज बीरीया, जीवन भगत, संतोष बोरकर, मिथुन चौहान, अजय रामटेके, संजय नगराळे व मोठ्या संख्येने सफाई कामगारांचे वारस उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *