जुन्या पेंशन योजनेकडे कानाडोळा, सैनिक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची निराशाच
केंद्रीय अर्थसंकल्पात हजारो कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी, देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सैनिक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशन योजनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल विधान परिषदेचे सदस्य सुधाकर अडबाले यांनी तीव्र टीका केली आहे.
अडबाले म्हणाले की, “१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशन योजनेच्या मागणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. सोबतच कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याने कर्मचाऱ्यांत मोठी निराशा आहे. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात शेतपिकांचे भाव केवळ ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत, तर याच काळात महागाई मात्र दुप्पट झाली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांना, विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणाऱ्या शिक्षकांना आणि देशाच्या विकासासाठी कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पात पुरेसे महत्त्व दिले नाही. सरकारकडे जी मागणी करतात ते देत नाही आणि जी मागणी करत नाही त्यावर सरकार कोट्यवधी रुपयांची उधळण करीत आहे, अशी टीका केली आहे.