आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने शिक्षण उपसंचालक यांच्यासोबत समस्या निवारण सभा
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा
नागपूर : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘समस्या तुमच्या, पुढाकार आमचा’ या उपक्रमाअंतर्गत विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यासोबत नागपूर विभागातील कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्या निवारण सभा ७ ऑक्टोबर २०२५ रोजी कै. आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद, नागपूर येथे पार पडली. तब्बल ९ तास चाललेली सभा प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्य.) / वेतन पथक अधीक्षक भंडारा, वाढीव टप्पा वाढ अनुदान पत्र, प्रलंबित शालार्थ आयडी व अन्य मुद्द्यांवर गाजली.
सभा दुपारी १ वाजता सुरु झाली. सभेत मा. प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. भंडारा व वेतन पथक अधीक्षक (माध्य.) भंडारा यांच्या नियमबाह्य व अनियमिततेच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने सभेत रोष व्यक्त करण्यात आला. हा विषय बैठकीत सभेत चांगलाच गाजला. आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीनंतर मा. शिक्षण संचालक पूणे यांनी त्यांची चौकशी सुरु केली आहे.
नागपुरात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतरपासून नवीन नियुक्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी देण्यात आल्या नव्हत्या. तसेच आता शासनाने सर्व कागदपत्रे हे ऑनलाईन केल्याने आयडी मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी नागपूर विभागाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. जिल्हानिहाय प्रलंबित प्रकरणे तात्काळ ऑनलाईन करून शालार्थ आयडी देण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना सूचना दिल्या.
खासगी अनुदानित शाळा/तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना टप्पा अनुदान आदेश देण्यास विलंब होत असल्याने सभेत अनेक शिक्षकांनी रोष व्यक्त केला. वाढिव टप्पा अनुदान आदेश वितरीत करून वेतन अदा करा, अश्या सूचना आमदार अडबाले यांनी केल्या. यावर शिक्षण उपसंचालक यांनी लवकरात लवकर आदेश वितरीत करू असे सांगितले.
सभेत प्रलंबित मान्यता वर्धित व मंडळ मान्यता, प्रलंबित थकबाकी, वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरण, वरिष्ठ / निवड श्रेणी, जीपीएफ परवाता / नापरतावा देयके, पेंशन केस, संचमान्यता, वैयक्तिक मान्यता, ग्रंथपाल थकबाकी, अनुकंपा प्रकरण, शिक्षक – कर्मचाऱ्यांचे समायोजन व अन्य अश्या तब्बल २०० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना सभेत आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक व सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), वेतन पथक अधीक्षक यांना दिल्या. तसेच माध्यमिक शिक्षण विभाग नागपूर येथील श्री. मेंढूलकर यांच्या आस्थापनेची चौकशी करण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांना दिल्या.
सभेला नागपूर विभागातील मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. सभागृह पूर्ण भरगच्च भरून होते. ही सभा रात्री १० वाजून ५ मिनीटांनी संपली.
आज ९ ऑक्टोबर २०२५ रोजी कै. आबासाहेब खेडकर सभागृह, जिल्हा परिषद, नागपूर येथे सुरु असलेल्या प्राथमिक विभागाच्या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील ६५ अंशतः अनुदानित शाळा / तुकड्यांना टप्पा अनुदान आदेश आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आले.
सभेला शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधीक्षक, माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, रवींद्र नैताम, सुनील शेरकी, विष्णू इटनकर, अनिल गोतमारे, ओमप्रकाश गुप्ता, विठ्ठल जुनघरे, दिगांबर कुरेकार, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, अजय लोंढे, दीपक धोपटे, महेंद्र सालंकार, संजय वारकर, संदीप मांढरे, अविनाश बडे, सुरेंद्र अडबाले व मोठ्या संख्येने नागपूर विभागातील विमाशि संघाचे पदाधिकारी, सदस्य, समस्याग्रस्त शिक्षक उपस्थित होते.