विधिमंडळात गाजला आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्न
चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्राच्या रोपवे प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणावर कोळसा साठवला जातो, जो रोपवेच्या माध्यमातून महाऔष्णिक वीज केंद्रात पाठवला जातो. मात्र, या प्रक्रियेमुळे परिसरात प्रचंड धूळ आणि प्रदूषण पसरत आहे. यामुळे ऊर्जानगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाच्या विकारांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असल्या तरी ठोस उपाययोजना न केल्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आरोप आमदार सुधाकर अडबाले यांनी आज विधिमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला.
विधान परिषद सभागृहात बोलताना आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, “महाऔष्णिक वीज केंद्रात वापरला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा आहे, ज्यामुळे संचांमधून मोठ्या प्रमाणात राख आणि धूळ हवेत पसरते. यामुळे १० किलोमीटरपर्यंत प्रदूषण पसरत असून, नागरिकांच्या घरांमध्येही राख साचत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, अनेकांना श्वसनाचे आणि इतर गंभीर आजार होत आहेत. काही दिवसांपूर्वी महाऔष्णिक वीज केंद्राने इरई नदीमध्ये केमिकल मिश्रित पाणी सोडल्याने जलप्रदूषण झाले. परिणामी, चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आणि हजारो नागरिकांना स्वच्छ पाणी मिळवण्यात अडचणी आल्या. प्रशासन वारंवार होणाऱ्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.”
निकृष्ट दर्जाचा कोळसा वापरून अनियमितता करून प्रदूषण वाढवणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील अधिकारी आणि यास पाठबळ देणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? हवा प्रदूषण कायदा १९८१ च्या कलम २२ आणि २४ नुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाऔष्णिक वीज केंद्राची आजपर्यंत तपासणी केली का? तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत का? असा प्रश्न आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केले.
त्यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “आम्हाला तक्रार प्राप्त झाली आहे आणि त्यावर तपासणी केली असता प्रदूषण रोखण्यासाठी सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. ८ नंबर संचाची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले असून, इलेक्ट्रो स्टॅटिक प्रिसिपेटटरचे परीक्षण केले जाईल. याशिवाय, नऊ चा संच बंद आहे. संबंधित दुरुस्त्या केल्यानंतर संच सुरू करण्याचे प्रशासनाला सांगितले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी उद्योगांनी योग्य निकष पाळावेत. कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मी आश्वासन देते की, भविष्यात या बाबींबाबत बदल होईल. १५ लाख रुपयांची बँक हमी जप्त करणे हे पुरेसे नाही. चंद्रपूरसारख्या प्रदूषणग्रस्त भागात एक समिती गठित केली जाईल. या समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.