आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने प्रलंबित प्रकरणांस मान्यता
२५ च्या वर टप्पा अनुदान आदेश बैठकीत वितरीत
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची समस्या निवारण सभा
वाशिम :- आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा २९ सप्टेंबर २०२५ रोजी स्व. वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद, वाशिम येथे पार पडली. या सभेत विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने ५ प्रकरणे “ऑन द स्पॉट” निकाली काढण्यात आली. तसेच जिल्ह्यातील २५ च्या वर टप्पा अनुदान आदेश बैठकीत वितरीत करण्यात आले.
सभेत वैयक्तिक मान्यता, वरिष्ठ/निवड श्रेणी प्रकरणे व अन्य प्रकरणे कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची बाब आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षात आली. यावर आमदार अडबाले यांनी आजच्या आज मान्यता देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले. त्यानुसार बैठकीत दिनकर वानखेडे (लक्ष्मीनारायण इन्नानी विद्यालय वाशिम), आर. एस. राठोड (जगदंबा विद्यालय भामदेवी), महेश मुळे (छत्रपती शिवाजी विद्यालय शेंदुरजना मोरे) यांना वेतन देयकावर स्वाक्षरीचे अधिकार देण्याबाबत, गणेश मस्के यांना (संस्कार साधना विद्या मंदिर अनसिंग) व संगीता सुरेश गिरी (राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम) यांना गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेली निवड श्रेणीस ‘ऑन द स्पॉट’ मान्यतेचे पत्र देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील जवळपास २५ च्या वर टप्पा अनुदानित शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश बैठकीत वितरीत करण्यात आले.
सभेत जिल्ह्यातील अनुकंपा प्रकरण, वेतनेत्तर अनुदान, मान्यता वर्धित व मंडळ मान्यताबाबत, शिक्षक – कर्मचाऱ्यांचे समायोजन, वेतन, वैद्यकीय देयके, वरिष्ठ / निवड श्रेणी अश्या ८० च्यावर सामूहिक व वैयक्तिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. आमदार सुधाकर अडबाले यांनी दिलेल्या सभेच्या विषयपत्रातील बहुतांश प्रकरणे सभेच्या आधीच निकाली काढण्यात आली. ही सभा चार तास चालली.
यानंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी प्राथमिक विभागातील समस्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्पित चौहान यांच्यासोबत जिल्हा परिषद कार्यरत / सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत बैठक पार पडली.
यावेळी माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मंगल धुपे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. ससाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, वाशिम जिल्हाध्यक्ष रामेश्वर वाळले, जिल्हा कार्यवाह कुलदीप बदर, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश मुंदडा, माजी जिल्हाध्यक्ष जनार्दन शिंदे, पी. टी. शिंदे, प्रा. मंगेश भोरे, किशोर गवळी, सतीश जामोदकर, गजानन इढोळे, प्रा. संतोष राठोड, विनायक उज्जैनकर, मंगेश धानोरकर, पंढरी शिंदे, आश्रम शाळा पदाधिकारी परवेज राठोड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे, सचिव विजय शिंदे, रामेश्वर अवचार, गोविंद चौधरी, गडेकर, प्राथमिकचे पदाधिकारी महाले, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास ढवळे, सचिव कायंदे, प्राथमिकचे संघटनेचे पदाधिकारी व विमाशी संघाचे पदाधिकारी, सदस्य, जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.