Skip to content

आश्रमशाळा शिक्षक–कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत सहविचार सभा

आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर आयुक्त यांच्यासोबत बैठक

चंद्रपूर : दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या सभागृहात शासकीय व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्यांबाबत आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने सहविचार सभा पार पडली. या सभेत सामूहिक व वैयक्तिक समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या प्रलंबित समस्या प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त स्तरावरील समस्या तात्काळ निकाली काढाव्या, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी दिल्या.

सभेच्या प्रारंभी मागील बैठकींच्या इतिवृत्तावर चर्चा करून प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन मा. उपायुक्त यांनी दिले. विद्यार्थी साहित्य, गणवेश, गादी, ब्लँकेट, शूज इत्यादींचा पुरवठा, वर्ग-४ कर्मचारी पदभरती, शिक्षक संवर्गातील रिक्त पदे, प्रतिनियुक्ती रद्द करणे, नक्षलग्रस्त भत्ता लागू करणे, जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी खात्याबाबतचे आदेश, शाळांवरील सहाय्यक अधीक्षक पदे, दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक, कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाच्या प्रती, सुरक्षारक्षक नेमणूक, वेतनवाढ, कला-क्रीडा-संगणक शिक्षक नियुक्ती, प्रवास व कार्यालयीन खर्चासाठी निधी, अधीक्षक संवर्गाचे प्रशिक्षण, संवर्गीय पदोन्नती, अपंग कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता, शिक्षकांच्या तासिका नियोजन, लिपिक भरती, कार्यमुक्ती, वेतन निश्चिती, शालेय सुट्या, स्वयंपाकी व ग्रंथपाल यांना दीर्घ रजा, विद्यार्थ्यांसाठी केअर टेकर नेमणूक, तसेच अर्जित रजा रोखीकरण यासारख्या तब्बल ३१ मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

याशिवाय शिक्षकांना 4300 व 4800 ग्रेड पे मंजूर करावे, दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न, भ.नि.नी. प्रस्ताव, अनुकंपा तत्वावर नोकरी, कार्यमुक्ती अशा तातडीच्या विषयांवरही ठोस भूमिका घेण्यात आली. बहुतेक सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत अपर आयुक्त व उपायुक्त यांनी आश्वासन दिले.

सभेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना जोरकस पद्धतीने मांडताना मा. आमदार अडबाले यांनी “शिक्षक-कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी लढा देऊ, पण त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे प्रामाणिक लक्ष द्यावे” असे प्रतिपादन केले. अपर आयुक्त आयुषी सिंह यांनीही शिक्षकांच्या प्रश्नांवर सहानुभूतीपूर्वक निर्णय होईल, असे आश्वासन दिले.

या सहविचार सभेला अपर आयुक्त आरुषी सिंह, उपायुक्त डिगांबर चव्हाण, माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, सिटू संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, सिटू संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष आर. टी. खवशी, संस्कृती संघटनेचे विभागीय अध्यक्ष भोजराज फुंडे, अनुदानित/ शासकीय आदिवासी आश्रमशाळा संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष प्रमोद साळवे, सचिव मनोज आत्राम, कार्याध्यक्ष बजरंग जेणेकर, मार्गदर्शक चंद्रभान वरारकर, विकास जनबंधू, श्री. पवार, आर‌ एम पत्रे, सौ. के बी लांजेवार, कु. सुरेखा तेलतुंबडे, देव बनसोड, विवेक विरुटकर, श्री. भोंगाडे व समस्याग्रस्त शिक्षक, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *